देशद्रोही हेरांचे चक्रावून टाकणारे जाळे   

मधुरा कुलकर्णी 

देशात काही जण पैशासाठी इमान विकायला तयार होतात.‘ऑपरेशन सिंदूर’नंतर  पाकिस्तानच्या हस्तकांचा शोध सुरु झाला. त्यात  ज्योती मल्होत्रासह बाराजणांना हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक  करण्यात आली.भारतासोबत थेट युद्धात जिंकू शकत नाही, हे सार्वत्रिक सत्य असताना पाकिस्तान ‘छुप्या युद्धा’द्वारे  भारताला त्रास देत असतो. दहशतवादी कृत्ये त्याचाच एक भाग आहे. पाकिस्तानमधील सौंदर्यवतींचा उपयोग करून भारतीय लष्करातील तसेच संशोधन संस्थांमधील अनेकांना जाळ्यात अडकवण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘आय एअ आय’आणि तिथल्या सरकारमधील अनेकांची त्यासाठी फूस असते. दुर्दैवाने भारतातील अनेकजण त्याला बळी पडतात.
 
पहलगाम घटनेनंतर ‘युट्यूबर’ या नव्या जमातीतील बाराजणांना झालेली अटक हा दहशतवाद्यांना मदत करण्याचा एक वेगळाच पैलू पुढे आला आहे.   ‘हनीट्रॅप’मध्ये अडकून देशाची माहिती देणारे वेगळे आणि युट्यूबच्या माध्यमातून परदेशाची भलामण करून नंतर त्यांना आवश्यक ती माहिती देणारे वेगळे. ज्योती ही दुसर्‍या गटातील. युट्युबर ज्योतीने पैसे आणि प्रसिद्धीसाठी देशद्रोह केला. ज्योती मल्होत्रा तिच्या देखणेपणासाठी आणि युट्यूब आणि इंस्टाग्रामवर कंटेटसाठी प्रसिद्ध आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ज्योती  एक पाकिस्तानी गुप्तहेर असेल, असे तिच्या जवळच्यांनाही वाटले नव्हते. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिला आता अटक करण्यात आली आहे. तिच्या पाच मैत्रिणींसह आणखी ११ जण ही गजाआड गेले आहेत. ज्योतीला लहानपणापासूनच श्रीमंती छंद होते आणि ते पूर्ण करण्यासाठी तिने अभ्यासादरम्यान काम करायला सुरुवात केली; पण कठोर परिश्रमाने पुढे जाण्याऐवजी एक सामान्य मुलगी पैसा आणि प्रसिद्धीच्या लालसेत इतकी गुंतली, की तिने देशाविरुद्ध काम करायला सुरुवात केली. तपास यंत्रणा आता या हेरगिरीच्या संपूर्ण जाळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
हिसारमधील न्यू अग्रसेन कॉलनी येथे राहणारी ज्योती ही एका सामान्य घरातील मुलगी. वडिलांसोबत  छोट्या घरात राहणार्‍या ज्योतीला लहानपणापासूनच पैशाची कमतरता भासत होती. म्हणूनच तिने बारावीनंतर लगेच नोकरी करायला सुरुवात केली. ज्योतीने सुरुवातीला एका ‘कोचिंग इन्स्टिट्यूट’मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले. मग ती एका शाळेत शिकवू लागली. नंतर ती पुन्हा हिसारमधील एका ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट बनली; पण या कामांमुळे तिच्या इच्छा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. कोरोनाकाळात नोकरी गेली, तेव्हा तिने युट्यूबवर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. ती प्रवास आणि ब्लॉगिंगमधून पैसे कमवू लागली. याच मार्गावर चालत तिने ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचे एक युट्यूब चॅनल सुरू केले. तिचे आज ३.७७ लाख सबस्क्राइबर्स असून इंस्टाग्रामवर १.३१ लाख फॉलोअर्स आहेत. 
 
ज्योती पैशांसाठी आणि विलासी जीवनासाठी भरकटली. ती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात आली होती. त्याने तिचा फोन नंबर घेतला आणि संभाषण सुरू झाले. हळूहळू ज्योतीने पाकिस्तानमधून माहिती पाठवायला सुरुवात केली. ज्योतीने संपूर्ण भारतासह दुबई, नेपाळ, भूतान, चीन, थायलंड, इंडोनेशिया आणि पाकिस्तानचा प्रवास केला. ती दोनदा पाकिस्तानलाही गेली, एकदा शीख गटासोबत आणि एकदा एकटीच करतारपूर साहिबला भेट देण्यासाठी.  व्हिडीओमध्ये तिने पाकिस्तानची चांगली प्रतिमा दाखवली. ज्योतीच्या युट्युब चॅनलवर पाकिस्तानशी संबंधित अनेक व्हिडीओ आहेत. त्यात पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा चितारण्यात आली. तिने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओदेखील बनवले. याशिवाय, काश्मीर दौर्‍यावर बनवलेल्या व्हिडीओमध्ये सैनिकांचेही चित्रीकरण केले, जी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब होती. 
 
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दानिशच्या संपर्कात होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान भेटीचे काही व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनलवर पाहिले गेले आहेत. त्यात ‘पाकिस्तानमधील भारतीय मुलगी’, ‘कटास राज मंदिरातील भारतीय मुलगी’ आणि ‘पाकिस्तानात लक्झरी बस चालवणारी भारतीय मुलगी’ असा तिचा उल्लेख आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान ज्योती कथितपणे दानिशच्या संपर्कात होती आणि तिला पाकिस्तानी दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाली होती. ज्योती अनेकदा पाकिस्तानला आणि एकदा चीनला गेली होती. ज्योतीच्या आर्थिक व्यवहारांची आणि प्रवासाच्या तपशीलांची चौकशी केली जात आहे. 
 
ज्योतीचे घर साधे आहे; पण ‘सोशल मीडिया’वर तिची जीवनशैली खूपच महागडी दिसते. ज्योतीच्या अटकेनंतर तिच्या ओडिशा कनेक्शनची चौकशी करत आहेत. ज्योतीने पुरीमधील जगन्नाथ मंदिर, कोणार्क आणि चिल्का सरोवरासारख्या ठिकाणी भेट दिली होती. ती पुरीतील एका युट्युबरच्या संपर्कात होती.‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेला संवेदनशील लष्करी माहिती दिल्याबद्दल पोलिसांनी दोनजणांना अटक केली आहे. गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार सुखप्रीत सिंग आणि करणबीर सिंग पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेला ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित गुप्त माहिती देत होते. या माहितीत सैन्याच्या हालचाली आणि पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधील मोक्याच्या ठिकाणांचा समावेश होता. हरयाना पोलिसांनी पानिपत जिल्ह्यातील २४ वर्षीय नोमान इलाही याला पाकिस्तानमधील काही लोकांना संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली. 
 
पोलिस तपासानुसार उत्तर प्रदेशमधील कैराना येथील रहिवासी इलाही हा ‘आयएसआय’मधील अधिकार्‍यांच्या संपर्कात होता. इलाही एका कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता आणि त्याच्यावर पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. तो बहिण आणि मेहुण्यासोबत पानिपतमधील हाली कॉलनीत राहत होता. इलाहीच्या अटकेनंतर दुसर्‍या दिवशी हरयाना पोलिसांनी कैथलमधील २५ वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थ्याला पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक केली. कैथल जिल्ह्यातील गुहला भागातील देवेंद्र सिंगला ‘सोशल मीडिया’वर शस्त्रांसह फोटो पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली. 
 
पोलिसांना आढळून आले की सिंग गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तीर्थयात्रेसाठी पाकिस्तानला गेला होता. सिंग पंजाबमधील एका महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. तीर्थयात्रेदरम्यान सिंग पाकिस्तानी गुप्तहेर एजंटांच्या संपर्कात आला आणि परतल्यानंतरही त्यांच्या संपर्कात राहिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगने पतियाळा कॅन्टोन्मेंटची छायाचित्रे  काढून पाकिस्तान्यांना पाठवल्याची कबुली दिली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली नूह जिल्ह्यातील अरमान या २६ वर्षीय तरुणाला अटक केली गेली. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातील एका कर्मचार्‍यामार्फत भारतीय सैन्य आणि इतर लष्करी कारवायांशी संबंधित माहिती शेजारील देशाला दिल्याच्या आरोपाखाली अरमानला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर व्हॉट्सअ‍ॅप आणि ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’वरून बराच काळ माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश ‘स्पेशल टास्क फोर्स’ने रामपूर जिल्ह्यातील तांडा शहरातून आयएसआयच्या एका कथित एजंटला अटक केली. त्याचे नाव शहजाद आहे . शहजाद राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती देत होता. तो गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वेळा पाकिस्तानला गेला होता. त्याच्यावर सीमेपलीकडून सौंदर्यप्रसाधने, कपडे, मसाले आणि इतर वस्तूंची चोरटी आयात  केल्याचा आरोप आहे. 

Related Articles